पुणे - सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ काल बुधवार (दि. 23 मार्च)रोजी एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (Young Man stabbed on Sinhagad Road) मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
काय आहे प्रकरण - याप्रकरणी हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मयत मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने वार करत त्याची हत्या केली.
हल्लेखोरांचा शोध सुरू - वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील कारवाईसाठी मृतदेह ससून, रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - VIDEO: दहिसर परिसरात डोक्यावर दगड पडल्याने व्यक्तीचा मृत्यू.. घटना सीसीटीव्हीत कैद