बारामती - आज ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या काळात शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल चालवणे महत्त्वाचे बनले आहे. बारामतीतील राधिका संजय दराडे ही युवती गेल्या तीन वर्षापासून दररोज १०० किमी सायकलिंग करते. तिने आजवर विविध सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे. राधिकाने महाराष्ट्रसह उत्तराखंड, कर्नाटक, हैदराबाद आदी ठिकाणच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. उत्तराखंड येथील सायकलिंग स्पर्धेत तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे राधिकाची पटियाला येथील साई अकॅडमी मध्ये निवड झाली आहे.
काश्मिर ते कन्याकुमारी पार
राधिकाने मागील तीन वर्षांपासून नियमित शंभर किमी सायकलिंग बरोबरच काश्मिर ते कन्याकुमारी, बारामती पुणे, बारामती पंढरपूर, बारामती तुळजापूर असा आजपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी हा ४ हजार ७० किमीचा टप्पा कुटुंबियांबरोबर २८ दिवसात पार केला. या प्रवासादरम्यान 'बेटी बचाव बेटी पढाव' 'पर्यावरण वाचवा प्रदूषण टाळा' याबाबत जनजागृती करण्यात आली.
सायकलिंग रायडर म्हणून ओळख
राधिकाचे वडील संजय दराडे यांचा सायकलचा व्यवसाय आहे. दराडे येथील बारामती सायकल क्लबचे सदस्य असून ते दर रविवारी सायकलिंग करतात. वडिलांमुळे राधिका ही क्लबशी जोडली गेली व तिला सायकलींची आवड निर्माण झाली. वडिलानांबरोबरच बारामती सायकलचे क्लबचे अध्यक्ष अँड श्रीनिवास वायकर यांचे राधीकाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्यामुळे मला विविध स्पर्धांची माहिती मिळत गेली व मी विविध स्पर्धेत भाग घेऊ लागले. त्यामुळेच माझी एक सायकलिंग रायडर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशी माहिती सायकल पटू राधिका दराडे हिने बोलताना दिली.
सायकलिंग बरोबर घर कामातही अव्वल
'राधिकाने अधिकाधिक सराव करून सायकलिंग मध्ये नाव कमवावे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने प्रावीण्य मिळवावे अशी, माझी इच्छा आहे. यासाठी मी राधिकाच्या नियमित सरावासाठी तिला मदत करत असते. राधिका सायकलिंग बरोबरच घर कामातही तरबेज आहे', असे राधिकाची आई सुवर्णा दराडे यांनी सांगितले.
नियमित सायकल चालवण्याचे केले आवाहन
'तसे पाहिले तर लहानपणापासूनच सायकलशी प्रत्येकाचे नाते जोडलेल असते. लहानपणी प्रत्येकाने सायकल चालवण्याचा अनुभव घेतलेला असतो. मात्र जसजसे आपण मोठे होत जातो. तसतसे आपण सायकल पासून दुरावलो जातो. मात्र नियमित सायकल चालवल्याने आरोग्य तर तंदरुस्त राहतेच पर्यायाने इंधनाची बचत होऊन व पर्यावरणाची होणारी हानीही रोखली जाते. त्यामुळे सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा', असे आवाहन राधिकाने केले आहे.
हेही वाचा - जागतिक सायकल दिन विशेष - प्रणालीचा सायकलने ८५०० किलोमीटरच्या प्रवास