पिंपरी-चिंचवड (पुणे) - उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज ( Rahul Bajaj ) यांच्या निधनानंतर सर्व स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. महत्वाच म्हणजे राहुल बजाज यांच्या निधनानंतर कामगार हे भावूक झाले असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला ( workers reaction on Rahul Bajaj ) आहे. राहुल बजाज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच आमची मुले परदेशात शिक्षण घेत असून कुटुंब चालत आहेत, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.
कामगारांनी दिला आठवणींना उजाळा शनिवारी (दि. 12 फेब्रुवारी) राहुल बजाज यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले, ते 83 वर्षाचे होते. बजाज यांचे पार्थिव रविवारी (दि. 13 फेब्रुवारी) आकुर्डी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. तिथे नातलग, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. बजाज यांच्या आठवणींना उजाळा देत कामगारांचा हुंदका दाटून आला, शिवाय अनेकांना अश्रू अनावर झाले. साताऱ्यातील महाराष्ट्र स्कुटरच्या आठवणी सांगत कामगार सूर्यकांत देसाई म्हणाले की, राहुल बजाज यांनी हजारो हाताला काम दिले. अनेक चढ-उतार आले. त्यावेळी स्वतः बजाज साहेब हे महाराष्ट्र स्कुटर ( Maharashtra Scooter ) येथे आले. त्यांनी सांगितले की, उत्पादन कमी झालं म्हणून घाबरू नका. बजाजच्या एकाही कामगाराला मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना इतर ठिकाणच्या उद्योगात सामावून घेऊ. एवढा मोठा आधार त्यांनी कामगारांना दिला होता, असे म्हणताच सूर्यकांत देसाई यांना अश्रू अनावर झाले. तर, दुर्योधन वरणेकर म्हणाले की, राहुल बजाज यांना आम्ही देव समजतो, ते आमचे ईश्वर आहेत. मी महाराष्ट्र स्कुटरचा कामगार असून 25 वर्षांपासून त्या ठिकाणी काम करत आहे. आम्हाला त्यांनी रोजगार दिला. साताऱ्यातील हजारो कुटुंब त्यांच्यामुळे उभे आहेत, असे सांगत असताना ते भावनिक झाले.
हेही वाचा - Rahul Bajaj : देशातील सर्वात तरुण 'सीईओ' ते पद्मभूषण, थक्क करणारा राहुल बजाज यांचा प्रवास