पुणे - भारतात कोरोना विषाणूचा कहर वाढत असताना विविध क्षेत्राला याचा मोठा परिणाम भोगावा लागत आहे. उद्योग व्यवसाय ठप्प झाले असून, कष्टकरी हातावर पोट असलेली जनता हवालदिल झाली आहे. या वर्गासमोर आताच जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. भारतात 92 टक्के असंघटित कामगारांची संख्या आणि त्यातही महाराष्ट्रात संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे या वर्गासमोर भूकमारीची मोठी समस्या निर्माण झालेली असताना, अद्याप राज्य सरकारने त्याबाबत कुठली योजना काढलेली नाही ही खेदाची बाब असल्याचे मत असंघटित कामगारांसाठी लढणाऱ्या संतुलन संस्थेचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे यांनी व्यक्त केले आहे.

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आल्यामुळे या आदेशाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. मात्र, कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या जनतेने जगायचे कसे? हा खरा प्रश्न असल्याचे सांगत या जनतेसाठी काही मागण्या रेगे यांनी केल्या असून त्या मागण्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. कामगारांना मोफत रेशन द्यावे, प्रत्येक कामगाराच्या खात्यावर किमान रक्कम टाकावी, स्थलांतरित आणि बेघर लोकांच्या निवाऱ्याची सोय करावी, कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित करून मोफत वैद्यकीय उपचाराची सोय करावी तसेच कोरोनाग्रस्ताना प्रत्येकी 4 लाख रुपये द्यावे, अशा मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या वाघोली भागात 1 हजार 604 असंघटित कामगार कुटुंब आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा, अशी मागणी रेगे यांनी केली आहे. पुणे शहरातही रस्त्यावर राहणारी अनेक कष्टकरी कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अन्न आणि औषधाची मदत करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहनदेखील संतुलन संस्थेकडून करण्यात आले आहे.