पुणे(पिंपरी चिंचवड) - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत बसमध्ये महिला प्रवशासी वाद घालून त्यांना लुटणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी सात आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्या मुंबई- बेंगळुरू या महामार्गावर लूटमार करत असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
महिला प्रवाशांसोबत वाद घालून आरोपी महिला पळवायच्या मौल्यवान ऐवज
दोन दिवसांपूर्वी कराड ते मुंबई प्रवास करणाऱ्या महिलेला आरोपी महिलांच्या टोळक्याने गोंधळ घालून, प्रवाशी महिलेकडून सोन्या चांदीचे दागिने, दहा हजार रोख रक्कम असा एकूण 1 लाख 83 हजारांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला होता. तेव्हा, पोलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अर्चना मनोहर देवकर वय- 37 यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अशा पद्धतीने करत असे वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत संबंधित महिला बस ने लहान मुलांसह प्रवास करतात. महिला एकटी असल्याचं पाहून तसेच अंगावर असलेले सोन्याचे दागिन्यांची टेहळणी करून प्रवासी महिलेसोबत या किरकोळ कारण काढून वाद घालतात, गोंधळाचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याचे दागिने, पर्स अश्या मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढतात. हा सर्व प्रकार महामार्गावरील कराड, सातारा, चांदणी चाैक, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.