पुणे - मुबलक पाऊस होऊनही देवाच्या आळंदी नगरीत महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही आणि मिळाले तरी कमी दाबाने त्या पाण्यातही फेस व उग्र वास येत आहे. त्यामुळे आळंदी नगरपरिषदेच्या नगरसेविकेच्या नेतृत्वाखाली महिलांनी थेट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत हंडा मोर्चा काढला.
दैनंदिन कामे करताना महिलांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी वेळेवर आणि मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या महिला नगरसेविका अनेक मागणी करतात. मात्र, आता या नगरसेविकांच्या मागणीकडे नगरपरिषद दुर्लक्ष करू लागल्याने पाण्याच्या या लढाईने आता मोर्चाचे रूप घेतले आहे.
हेही वाचा - भरणेंना मंत्रीपद देऊन अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना धक्का
दरम्यान, काही प्रभागांमध्ये पाण्यासाठी नवीन लाईन देण्यात आली आहे. असे असले तरी अनेक दिवसांपासून या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नसल्यामुळे अनेक प्रभागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुबलक पाणी असतानाही देवाच्या आळंदीत महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही गंभीर बाब नगरपरिषदेने गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी महिलांनी यावेळी केली.
हेही वाचा - अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी, बारामतीत जोरदार जल्लोष