पुणे - पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेत आत्महत्या करणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येला जबाबदार धरत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. विद्या पोखरकर असे या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात त्या पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चारित्र्य पडताळणीचे काम त्या करतात. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
निलंबित कर्मचारी विद्या पोखरकर या खडकी पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत. 1 ते 22 जुलै या कालावधीत त्या चारित्र पडताळणीसाठी कर्तव्यावर होत्या. याच कालावधीत सुरेश पिंगळे त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. सुरेश पिंगळे यांना वेळेत चारित्र्य पडताळणी न करून देता त्यांना खडकी पोलीस स्टेशन येथे चकरा मारायला लावल्या. त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे सुरेश पिंगळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर पेटवून घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे विद्या पोखरकर यांनी कर्तव्यावर असताना बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा करून कसूरी केली, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
सुरेश पिंगळे यांना नोकरीच्या ठिकाणी चारित्र पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्यासाठी त्यांनी दोन जुलै रोजी खडकी पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. त्यानंतर 22 जुलै रोजी हा अर्ज पुढील कारवाईसाठी विशेष शाखेत पाठवण्यात आला होता. परंतु तुमचा वर गुन्हे दाखल आहेत असे सांगत त्यांना चारित्र्य पडताळणी वेळेत मिळत नव्हते. त्यामुळे सुरेश पिंगळे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयासमोरच पेटवून घेतले होते. गंभीररीत्या भाजलेल्या पिंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान पुणे पोलिसांनी मात्र सुरेश पिंगळे यांची आत्महत्या कौटुंबिक कारणातून झाले असल्याचे सांगितले. त्यांच्याजवळ असणाऱ्या पिशवीत पोलिसांना 8 पानाचे पत्र सापडले असून त्यात त्यांनी आत्महत्येची विविध कारणे लिहिली आहेत. त्यामध्ये वेळेत चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र न मिळणे हे देखील एक कारण आहे.
राज्याचे गृहमंत्री पाटील यांनी देखील या घटनेची दखल घेतली होती. ही घट्टा दुर्दैवी असल्याचे सांगत पिंगळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.