पुणे - दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नसून गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढत पालिकेच्या आवारात मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला.
बोपोडी प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास 100 महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा नेला. महिलांनी पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी केली.
आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत जाब विचारला. दरम्यान एका दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एक-दोन दिवसात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर महिलांनी आपले हंडा दांडिया आंदोलन थांबवले.