पुणे- जादूटोणा करत महिलेवर वारंवार बलात्कार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. ही खळबळजनक घटना कोरेगाव भीमा येथे घडली आहे. राहूल वाळके असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या जामिनावर बाहेर असून मोकाट फिरत आहे.
हेही वाचा- 'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'
पीडित महिला ही बाहेर गावची रहिवासी असून गेल्या दहा वर्षापासून पेरणे येथे वास्तव्यास आहे. महिलेच्या पतीने काही दिवसापूर्वी राहूल वाळके याच्याकडून उसने पैसे घेतले होते. याचाच फायदा घेत राहूलने पीडित महिलेशी मैत्री केली. पीडित महिलेवर पेरणे फाटा परिसरात वारंवार बलात्कार केला. या कृत्यावेळी आरोपीने महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी राहूल वाळकेवर बलात्कार आणि जादूटोणा याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपी अटक पूर्व जामिनावर मोकाट फिरत आहे.
पीडित महिला आरोपी पासून धोका होऊ नये म्हणून राहण्याचे ठिकाण बदलून कोरेगाव भीमा येथे आली. परंतु, आरोपीने येथेही महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुधवारी रात्री आरोपीने पीडित महिलेच्या घरी जाऊन पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला.
या सर्व धक्कादायक प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला अटक पूर्व जामीन मिळतोच कसा? असा सवाल करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरुन रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तातडीने अटक करुन कडक कारवाई करू, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.