पुणे- बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एकाकडून २० लाख रुपये उकळ्याचा धक्कादायक प्रकार नऱ्हे परिसरात घडला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला अटक केली असून २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडली आहे. अविनाश वसंत जाधव (वय २८, रा. दत्तनगर कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आरोपीची पत्नी तक्रादारच्या कंपनीत कामास
तक्रारदार यांची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. आरोपी अविनाशची पत्नी त्या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होती. तिने काही महिन्यांनंतर तिने नोकरी सोडली. त्यानंतर काही दिवसांनी अविनाशने तक्रारदारास फोन करून तुझे माझ्या बायकोसोबत संबंध आहेत. हे मला माहित असून मी तुझ्या घरी सांगून तुझी बदनामी करतो'. जर तू मला पैसे दिले नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने आरोपी अविनाशला वेळोवेळी असे एकूण २० लाख रुपये दिले.
पुन्हा ५० लाख रुपयांची मागणी-
त्यानंतर काही दिवसांपूर्वी अविनाशने पुन्हा तक्रारदाराला फोन करून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर मात्र तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अविनाशला २ लाख रुपये घेताना रंगेहात पकडले.
अविनाश सराईत गुन्हेगार-
अविनाशची कसून चौकशी केली असता त्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकाकडून २० लाख रुपये उकळल्याची कबूली दिली. अविनाश सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याच्याविरूद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांच्या पथकाने केली.
हेही वाचा- भारतीय शास्त्रज्ञांचा 'चातक' नॉट रिचेबल; मान्सूनचे कोडे उलगडण्याचा होता प्रयत्न
हेही वाचा- 'माझ्यासमोर जेधे, शेख, भंडारी यांचा खून करून आनंद व्यक्त केला'