पुणे - भोसरीमध्ये काही दिवसांपूर्वी घरातील 8 तोळे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या ओळखीच्या महिलेनेच ही चोरी केल्याचे उघड झाले आहेत. सोनाली श्रीकृष्ण मुंढे (वय-22, रा. शास्त्रीनगर), असे आरोपी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रेखा सांगळे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
फिर्यादी रेखा आणि आरोपी महिला सोनाली या दोघी पूर्वी शेजारी राहत होत्या. त्यामुळे एकमेकींच्या घरातील सर्व गोष्टी व वस्तू ठेवण्याची जागा त्यांना माहित होत्या. कालांतराने आरोपी सोनाली ही इतर ठिकाणी राहण्यासाठी गेली. त्यानंतर एक दिवस आरोपी सोनाली ही फिर्यादी रेखाच्या घरी आली. फिर्यादी बाथरूमला जाताच सोनालीने काही मिनिटातच 8 तोळे सोन्याचे दागिने चोरून आपल्या बॅगेत ठेवले व काही वेळाने आपल्या घरी निघून गेली.
दरम्यान, आपल्या घरी चोरी झाल्याचे फिर्यादीच्या उशीरा लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दिली. तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकाने सोनालीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सोनालीनेच चोरी केल्याचे चौकशीत उघड झाले. 8 तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी काही सोने तिने गहाण ठेवले आहे व त्यातून मिळलेल्या पैशातून मोबाईल विकत घेतला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी निलेश डगळे, स्वाती मोरे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, सागर जाधव, संतोष महाडिक, गेंगजे, मुळुक, लांडे यांनी केली.