पुणे - आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दत्तवाडी परिसरातील एका घराची संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. संगीता नितीन रणदिवे असे या महिलेचे नाव आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगीता शिंदे या कचरा गोळा करण्याचे काम करत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, कचरा वेचत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक भिंत अंगावर कोसळल्याने संगीता त्याखाली दबल्या गेल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तेथील भिंतीजवळ राडारोडा टाकण्यात आला होता. आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे भिंत खचली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, स्थानिक नागरिकांनी आधीच संगीता रणदिवे यांना रुग्णालयात दाखल केले होते.