पुणे - सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दोन लहान मुलांसह कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथे खडकवासला धरणाच्या उजव्या कालव्यात संबंधित महिलेने गुरुवारी(20 फेब्रुवारी) उडी मारली होती. यानंतर दोन मुलांचे मृतदेह काही वेळातच सापडले. मात्र, महिलेचा मृतदेह आज यवत हद्दीतील कालव्यात सापडला आहे. नंदिनी उर्फ अनिता लक्षदीप वांजळे (वय-31), मल्हार उर्फ माधव लक्षदीप वांजळे (वय-2 वर्षे) आणि मधुरा लक्षदीप वांजळे (वय- 3वर्षे) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. महिलेच्या भावाने बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, यवत पोलिसांनी नंदिनीचा पती लक्षदीप वांजळे, सासरे सुरेश निवृत्ती वांजळे, सासु निर्मला वांजळे, नणंद सारीका रवींद्र वांजळे तसेच अन्य दोन नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हुंड्यासाठी करत होते छळ
नंदिनी व लक्षदीप वांजळे यांचे 2015साली लग्न झाले. यानंतर सासरच्या लोकांनी तिचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. तसेच पैशाच्या मागणीसाठी नंदीनीला शिवीगाळ व मारहाण होऊ लागली. माहेरच्या लोकांनी समजावल्यानंतरही छळ न थांबल्याने तिने मुलांसह आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले.
आत्महत्या केलेल्या दिवशीच दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. मात्र, कालव्याच्या कडेला नंदिनीची पायातील चप्पल आढळून आली होती. त्यामुळे नंदिनीने देखील कालव्यात उडी मारल्याची शंका व्यक्त होत होती. शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. यानंतर आज सकाळी यवत गावच्या हद्दीत हॉटेल अन्नपूर्णाच्या पाठीमागील बाजूस नंदिनीचा मृतदेह सापडला. तिन्ही मृतदेहांचे यवत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नंदिनीच्या माहेरी ते (शिंदवणे, ता. हवेली) नेण्यात आले.
नंदिनीच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यानुसार अखेर पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.