पुणे - मावळमधील टाकवे गावात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तीन लिंबांवर ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिहून ते पिंपळाच्या झाडाला खिळ्याने ठोकण्यात आले आहेत.
मावळ टाकवे येथील धक्कादायक प्रकार
मावळमधील टाकवे ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषीनाथ शिंदे यांची नाव असलेली लिंब ही पिंपळाच्या झाडाला ठोकून जादूटोणा केला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार मावळमधील टाकवे येथील इंद्रायणी नदी भैरवनाथ मंदिराच्या समोर घडला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा सर्व प्रकार सरपंच आणि उपसरपंचपदासाठी केला असल्याचा त्यांचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.