पुणे - संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मित्राला सुपारी देऊन खून केल्याचे समोर आले आहे. मानसिक त्रास आणि होणारी मारहाण यातून मुक्त होण्यासाठी पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यासाठी पत्नीने मित्राला 1 लाख 30 हजार रुपयांची सुपारी दिली होती. दरम्यान, आरोपी पत्नीसह 4 जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
येशू मुरुगन दास ( वय-45) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी उर्सुला येशू दास (वय-39) मित्र भाऊराव राम आरे (वय- 24), रज्जाक नसरुद्दीन शेख (वय -19), लखन सहदेव कापरे (वय- 21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 दिवसांपूर्वी येशू मुरुगन दास यांच्या गळ्यावर, मानेवर आणि अंगावर धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना निगडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली होती. या घटनेप्रकरणी आरोपी पत्नी उर्सुला हिने निगडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जण जागीच ठार
पत्नी उर्सुला ही स्कूलबसवर काही वर्षांपासून काळजी वाहक म्हणून काम करत होती. तिचे आणि बसचालक भाऊराव आरे यांच्यात मैत्रीचे संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. खून झालेल्या येशूदासच्या पत्नीनेच खुनाची सुपारी दिल्याचे त्याने कबुल केले. भाऊराव आरे याने इतर मित्रांच्या मदतीने येशूदासचा खून केला.
हेही वाचा - 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'
दरम्यान, येशूदास हा पत्नीवर सारखा संशय घ्यायचा. तो ही काही वर्षांपूर्वी बस चालक होता. पत्नी उर्सुला ज्या ठिकाणी काम करायची तिथे जाऊन येशूदास सर्व स्टाफसमोर पत्नीवर संशय घेऊन अश्लील शिवीगाळ करत असायचा. सतत मारहाण करून त्रास देत होता. दोघांना 9 वर्षाचा मुलगा आणि 14 वर्षांची मुलगी आहे. येसूदास हा देहूरोड ला एकटाच राहात होता.
स्कूलबसवर असलेला मित्र भाऊराव याला उर्सुलाने पतीला मारण्याची 1 लाख 30 हजार रुपयांची सुपारी दिली होती. पहिल्यांदा त्याला 7 हजार रूपये दिले. तर खून केल्यानंतर अडीच हजार तर उर्वरित रक्कम घर विकून देणार होती. मात्र, पोलिसांनी आरोपींचा मुसक्या आवळल्या.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, शंकर बांगर, मच्छिन्द्र घनवट, पोलीस कर्मचारी कल्याण महानोर, प्रवीण मुळूक, विनोद होनमाने, सतीश ढोले, विलास केकाण यांच्या पथकाने केली आहे.