पुणे - जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेच्या शाळांमधील काही खोल्या शस्त्रसाठा ठेवण्यासाठी पोलीस दलाला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर हे सर्व होत असताना शिक्षक मात्र जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना धडे देत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा शस्त्रसाठा हा अंकुशराव बोऱ्हाडे आणि विद्या निकेतन शाळेत ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्तालयाने पालिकेशी करार केला आहे. यासाठी मासिक भाडेही भरण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे या शाळेतील शेकडो मुलांच्या जीवाशी खेळ होताना दिसत आहे. पोलीस दलाचा शस्त्रसाठा असलेल्या खोली शेजारीच बालवाडीतील विद्यार्थी मुळाक्षरे गिरवत आहेत.
पोलीस मुख्यालयासाठी संबंधित शाळेच्या इमारतीमधील खोल्या भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. तळ मजल्यावरील खोलीत काडतुसे, बंदुका, अश्रूधुराच्या नळकांड्या इतर साहित्यासह दारूगोळा ठेवण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे हा शस्त्र साठा आणि दारुगोळा हे ज्या खोलीत ठेवण्यात आला आहे त्याच्या शेजारीच बालवाडीतील आणि इयत्ता पाचवीमधील विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. याचा विपरीत परिणाम मुलांवर होण्याची शक्यता व्यक्त करत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच वेळीच शस्त्र साठा संबंधित शाळेतून दुसऱ्या ठिकाणी हलवला नाही तर मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णयही पालकांनी घेतला आहे.