पुणे - पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प अधिक महत्त्वाचा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पुण्यात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे आठही उमेदवार उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, आकाशात मेट्रो बांधली, खालचे काय? पिलरमुळे रस्ता कमी झाला. कार, दुचाकी खालून जाणार, त्याचे काय? त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणखी होणार आहे. यापेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट कमी खर्चाचा होता. शहरातील नद्यांचा उपयोग जलवाहतुकीद्वारे ये-जा करण्यासाठी करता येऊ शकतो. धरणांत चांगला पाणीसाठा होतो, शहराच्या हद्दीत पाणी कसे खेळवायचे, कोणत्या वेळी सोडायचे, थांबलेले पाणी वॉटर वेसाठी सोडायचे, याचे सर्व नियोजन आमच्याकडे आहे. आमची सत्ता आली तर, वॉटर ट्रान्सपोर्टला प्राधान्य देणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.
हेही वाचा - इकडं मान वाकव, तिकडं मान वाकव... स्वाभीमान कसला ही तर लाचारी - उद्धव ठाकरे
पुण्यात केवळ एफयसआय वाढविणार असल्याचे सांगण्यात येते. पुण्याचा आकार हा कपबशी सारखा आहे. पुणे आणि मुंबईत फरक आहे. मुंबई ही आकाशातच वाढणार आहे, तसे पुण्याचे होणार नाही. पुण्याचा कचरा फुरसुंगी गावात जिरविण्यास विरोध आहे. आमच्याकडे हा कचरा जिरविण्याचा प्लॅन रेडी असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2014 ते 2019 या 5 वर्षांत 2 लाख कंपन्या बंद पडल्या. 4 माणसाप्रमाणे 8 लाख माणसांचा रोजगार गेला. मग आता 1 कोटी रोजगार कसे देणार? आम्ही पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याची मागणी करीत आहे. त्यामुळे 7 लाख पोलीस अजून भरती होतील. आम्ही जे शक्य आहे तेच सांगतो. भाजपसारख्या वलग्ना करीत नाही. यशवंतराव चव्हाण यांची नीती वापरून कारखानदारी उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - आमची परिस्थिती इकडे आड, तिकडे विहीर - महादेव जानकर