पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुसळधार पाऊस झाला असून यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने परिसराला तळ्याचे स्वरुप आले आहे. शहरात वेगवेगळ्या भागात आत्तापर्यंत 42 घटना घडल्या आहेत. आकुर्डी येथे वादळी वाऱ्याने झाडं पडली आहेत. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलीस घटना ठिकाणी पोहोचले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात रात्री नऊच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने शहरात अनेक ठिकाणी नाले ओव्हरफ्लो झाले. अनेक चौकांमध्ये चेंबर तुंबल्याने पाणी साचले. पाण्याचा निचरा होत नसल्याने घरांमध्येही पाणी शिरले. शहरात अशा प्रकारच्या 42 घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस शहरात सुरू आहे. मात्र गेल्या 12 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली.