पुणे - मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याऐवजी ‘मुलगी म्हणजे खर्चाला भार’ या विचाराने तिला नकोशी करुन मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. तर दुसरीकडे हैदराबाद, कोपर्डी येथे घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात. मात्र, शिरुर तालुक्यातील पाबळ येथील कोल्हे कुटुंबाने 'बेटी धनाची पेटी’ असे म्हणत फुलाच्या पायघड्या टाकत मुलीच्या जन्माचे स्वागत केले.
शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ऋषिकेश कोल्हे आणि त्यांची पत्नी प्रतिक्षा कोल्हे यांना लग्नानंतर पहिलीच मुलगी झाली. प्रतिक्षा कोल्हे यांनी आपल्या माहेरी 25 सप्टेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर 2 महिन्यानंतर प्रतिक्षा कोल्हे आपल्या सासरी पाबळ येथे आल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिभा आणि त्यांच्या मुलीने घरामध्ये प्रवेश करताना दोघींचेही औक्षण करत त्यांना ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत या माय-लेकीचे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - भारतीय नौदलात रचला इतिहास, शिवांगी स्वरुप बनल्या पहिल्या महिला पायलट
मुलगी ही परक्याचे धन आहे, अशी व्याख्या करून ‘मुलगी नको’ असे म्हणणाऱ्या पालकांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, तिच्या रूपाने घरात लक्ष्मी यावी, हा मुख्य उद्देश ठेवून मुलीचा जन्म लक्ष्मीच्या पावलांनी करण्याचा निर्णय कोल्हे कुटुंबाने घेतला आहे. तसेच जन्मलेल्या मुलीच्या नावावर 1 लाख रुपयांची ठेव बँकेत ठेवली आहे. एवढेच नव्हे तर पैशातून येणाऱ्या व्याजांतून गोरगरीबांच्या मुलीकरिता शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्पही या कोल्हे दाम्पत्याने केला आहे.
मातृशक्तीचा आदर करत सर्वसामान्य कोल्हे कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल.