पुणे - मौज मजा आणि बी.एम.डब्ल्यू दुचाकी विकत घेण्यासाठी सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ लाख ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अरमान प्रल्हाद नानावत (वय, २०), धनराज शांतीलाल शेरावत (वय, १९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका दुचाकीवरून हे दोन संशयित भरधाव वेगात जात होते. गस्तीवर असलेल्या वाकड पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे शेरावत आणि नानावत या दोघांना वाकड पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपींचा साथीदार मंगलसिंग बजरंग राजपूत (वय, २०) हा अद्याप फरार आहे. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - सोशल मीडियावर भन्नाट मीम्स... मी पुन्हा येईन वरुन फडणवीस ट्रोल तर पवारच चाणक्य
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, विक्रम जगदाळे, रमेश गायकवाड, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कण्हेरकर, सुरेश भोसले, नितीन ढोरजे, विक्रम कुदळे, विजय गंभीर, प्रमोद कदम, दीपक भोसले, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, सूरज सुतार, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे यांनी ही कारवाई केली.