पुणे - जगासमोर शिक्षण प्रणाली कार्यपद्धतीचा यशस्वी प्रयोग पुण्याच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने ठेवला आहे. त्यामुळे वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे जगाने कौतुक केले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आल्याने वाबळेवाडी शाळेच्या वारे गुरुजींच्या संकल्पनेतून 'ग्रुप होम स्कूलिंग'चा यशस्वी प्रयोग समोर आला. यात विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका बजावत आहेत.
कोरोनामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या 30 गावातील 434 विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्याच घराजवळ, ग्रुप होम स्कूलिंगच्या माध्यमातून सुरू आहे. यात ज्ञान देण्याचे काम विद्यार्थीच करत आहे. शिकवणाऱ्या विद्यार्थांना शिक्षक व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. यामध्ये पालकांनीही उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थांना शिक्षणाचा एक वेगळा नवीन पर्याय उभा राहिला आणि मुलांच्या शिक्षणाचा अडथळा दूर झाला आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळकरी मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झाला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही. अनेक विद्यार्थांच्या पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने, ऑनलाइन शिक्षण देण्यासही अडचण निर्माण होत होती. अशा काळात विद्यार्थी-पालक, शिक्षक व विद्यार्थी विषयमित्र अशा एका वेगळ्या संकल्पनेतून 'ग्रुप होम स्कूल' सुरू झाले. बाल वयात गुरुजींच्या मार्गदर्शनातून, अद्यावत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थीच शिक्षकांची भूमिका पार पाडत आहेत.
हेही वाचा - कोथरूड माइर्स एमआयटी शाळेतील एसएससी बोर्ड बंद करण्यास पालकांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
हेही वाचा - पडळकर यांची लायकी आहे का?... पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक