पुणे - चाकण-मुंबई महामार्गावर चाचणीदरम्यान व्होक्सवॅगन कंपनीच्या गाडीने पेट घेतला. बोर घाटातील मेकॅनिक पॉईंटजवळ कारने अचानक पेट घेतल्याने आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्याकडे येणारी वाहतूक जवळपास अर्धा तास रोखून धरण्यात आली होती.
या महामार्गावर कायमच नवीन वाहनांची चाचणी घेण्यात येते. ही कार चाचणीसाठी खोपोली येथून चाकणला येत होती. आग लागल्याचे चालकाला वेळीच लक्षात आल्याने जीवितहानी टळली. या घटनेनंतर काही वेळातच आग विझविण्यासाठी देवदूत रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पंरतु, तोपर्यंत कारने पुर्णपणे पेट घेतला होता. यामध्ये कार जळून खाक झाली. या घटनेनंतर वाहतूक रोखून धरल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आग विझविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नवीन गाड्यांची चाचणी घेतली जात असताना सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. महामार्गावर अशा पद्धतीने चाचणी सुरु असताना वाहने पेट घेत असतील तर ते इतर प्रवाशांसाठी धोकादायक ठरु शकते.