पुणे - शरद पवार हे राज्याचे आणि देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे. परंतु याही वयात त्यांना फिरावे लागते हे पाहून दुःख वाटते, असे मत शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.
पुण्यात शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले, राष्ट्रवादीत स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी स्वतः जबाबदारी उचलून महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता. परंतु, आज पाहिले तर शरद पवार स्वतः फिरताना दिसत आहेत. हे चित्र क्लेशदायक आहे.
मेटेंनी या वेळी युतीच्या जागावाटपावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. युती झाली नाही तर शिवसंग्राम स्वतंत्र लढण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.