पुणे - गेल्या ५ वर्षात भाजपने शिवसंग्रावर अन्याय केला असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपने माझ्यावरचा हा अन्याय दूर करावा, अशी मागणी मेटेंनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांनी वेळोवेळी ती नाराजी बोलून देखील दाखवली आहे. त्यांच्यावर भाडपने अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपने मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देऊन अन्याय दूर करावा अशी मागणी त्यांनी केल्याने, आता भाजप यावर काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या भाजपच्या विधानपरिषद आमदारांमध्ये मी सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने विरोधी पक्षनेते पदावरही आपलाच हक्क असल्याचा दावा मेटेंनी केला. दरम्यान, भाजपमधील ओबीसी नेत्यांच्या वादाबद्दल विचारले असता बीडमधील भाजपचे राजकारण पंकजा मुंडे यांच्याशिवाय हलत नाही असा अप्रत्यक्ष टोलाही मेटेंनी लगावला. शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक झाली, त्यानंतर मेटे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.