पुणे - वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची ३३० वी पुण्यतिथी शुक्रवारी मृत्युंजय आमावस्येला बलिदान दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यावेळी गावकऱ्यांसह राज्यभरातून येणारे शंभुभक्त संभाजी महाराजांना मानवंदना देतील.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळापासून शुक्रवारी सकाळी मिरवणूकीला प्रांरभ होणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल. यानंतर पोलीस दलाकडूनही संभाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. यावेळी वढू व तुळापूर येथील समाधी स्थळावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. त्यानंतर याठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या शंभू भक्तांना बलिदान स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन आणि वढू-तुळापूर ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा, किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा दंगल आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.