पुणे - पुलवामा सारख्या घटनांचा वापर राजकीय सभांमध्ये करणे चूक आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले आहे. पुलवामाबाबत माध्यमांमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात बोलणं वेगळं मात्र, राजकीय फायद्यासाठी सभांमध्ये त्याचा वापर करायला नको, असे मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केले आहे.
अॅक्टिंग अॅकडमीबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी (६ मे) पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजकीय घडामोडींवरही त्यांनी आपली मते मांडली. 'अनेक जण राजकारणात येण्याचा आग्रह करतात. मात्र, राजकारणाला लांबूनच नमस्कार आहे, असे सांगत मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या अनेक अभिनेते राजकारणात जातात. मात्र, त्यांना राजकारणाचा अभ्यास करणे नितांत गरजेचे आहे. जसे मोदी-शाह यांनी पुलवामावरून मतं मागू नये, त्याचप्रमाणे विरोधकांनी दुष्काळासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरू नये, असा टोला ही विक्रम गोखले यांनी यावेळी लगावला आहे. राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे. राजकारण्यांनादेखील योग्य प्रशिक्षणाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आगामी काळात आत्मचरित्र लिहिणार का यावर बोलताना ते म्हणाले, की 'जवळपास सगळी आत्मचरित्र खोटी असतात. मी आत्मचरित्र लिहिण्या इतका मोठा नाही. मात्र माझे अनुभव मांडणारे एक पुस्तक लिहिणार असे त्यांनी शेवटी सांगितले.