पुणे: विक्रम गोखले हे स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जात असत. त्यामुळे त्यांना अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागले. अलिकडच्या काही वर्षात त्यांनी केलेली अनेक विधाने चर्चेत राहिली आणि आपल्या भूमिकेवर ते ठाम राहून होणाऱ्या टीकेचाही त्यांनी सामना केला आहे.
कंगना रणौतचे समर्थन: अभिनेत्री कंगना रणौतने भारताला 1947 साली मिळालेले स्वतंत्र हे भीक होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यात समर्थन मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील केले. त्यानंतर राज्यभरातून आणि देशभरातून विक्रम गोखले यांच्या विरोधातही संतापाची लाट उसळली होती. यानंतर या वक्तव्याबाबत विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरणही दिले होते.
सावरकर समर्थक विक्रम गोखले: होय मी सावरकर भक्त आहे. ब्राम्हण आणि ब्राम्हणेत्तर हा वाद ज्यांना कायम ठेवायचा आहे त्यांना सावरकर कधीच कळू शकणार नाहीत, असे वक्तव्य विक्रम गोखले यांनी केले होते. गोखले यांनी यावेळी सोनिया आणि राहूल गांधींवरही कठोर टीका केली होती. गोखले म्हणाले होते की, "मी सावरकर माहित असलेला माणूस आहे. त्यांचे साहित्य, काव्य मी वाचले आहे. सोनिया गांधींना सावरकरांवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही" सोनिया आणि राहूल गांधींनी सावरकरांचे कोणते साहित्य वाचले आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. सावकरांनी केवळ आपले समाजहिताचे काम सुरू ठेवण्यासाठी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असेही ते म्हणाले होते.
भिकार सिरीयल पाहणे बंद करा: प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार सिरीयल पाहणे बंद करा, असे मत ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी मांडले होते. अशा मालिकामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील, असेही ते पुढे म्हणाले. चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा नाटक सिरीयल नक्की पहा, असे आवाहन राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. कल्याणात सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी ही मते व्यक्त केली होती. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे. आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले होते.