पुणे - शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेली 25 वर्षे सलग 5 वेळा भाजपचे गिरीश बापट येथून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट हे लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आल्याने, कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आता नवा चेहरा दिला जाणार आहे. मात्र, येथून इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे तिकीट द्यायचे कोणाला? असा प्रश्न भाजपसमोर उभा राहू शकतो.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कसबा विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. या निवडणुकीत गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार रोहित टिळक यांचा पराभव करत कसब्याचा बालेकिल्ला राखला होता. पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात गिरीश बापट यांचा दांडगा जनसंपर्क आणि भाजप तसेच संघाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर बापट या ठिकाणी सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. मात्र, या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहता, या मतदारसंघात विकासकामे करण्यास अनेक अडचणी येतात.
रखडलेली विकासकामे
१) गिरिश बापट पालकमंत्री असताना पुण्याचा स्मार्ट सिटीत समावेश झाला
मात्र, कसबा स्मार्ट झाला नाही.
२) कसब्याला मेट्रो मिळाली, पिंपरी - स्वारगेट हा मेट्रो मार्ग कसब्यातून जातो.
३) वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही कायम आहे.
४) जुन्या वाड्याच्या विकासाचा प्रश्न अद्यापही मार्गी नाही.
५) पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही कायम
६) नदी सुधार योजनेचा प्रश्न रखडून राहिला
सर्व जाती धर्मातील रहिवासी असलेला कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपकडे इच्छुकाची मोठी गर्दी आहे.
भाजपकडून कोण आहे इच्छुक
१) महापौर मुक्ता टिळक
२) नगरसेवक हेमंत रासने
३) धीरज घाटे
४) गणेश बिडकर
५) गिरीष बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट
आपल्यालाच कसब्यातून विधानसभेची उमेदवारी मिळायला हवी म्हणून या इच्छुकात मोठी रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. ऐनवेळी पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये म्हणून, अलीकडेच कसब्यातील राजकारणात सक्रिय झालेल्या गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर आघाडीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे.
काँग्रेसकडून इच्छूक
काँग्रेसकडेदेखील कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत.
१) नगरसेवक रविंद्र धगेकर
२) अरविंद शिंदे
बापट लोकसभेवर निवडून गेल्याने कसब्यात यावेळी निश्चितच इतिहास घडेल असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवारांना आहे. कसब्यातील वाहतूक कोंडी, जुन्या वाड्याचा विकास असे कित्येक प्रश्न मार्गी न लागल्याने कसब्यातील मतदार यावेळी निश्चितच काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास या इच्छुकांना आहे. तर युतीमधील शिवसेनेचे कसबा मतदारसंघातील नगरसेवक विशाल धनवडे हेदेखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तर प्रचारदेखील सुरू केलाय. त्यामुळे कसब्याचा आवाज कोण ठरणार याचीच चर्चा आहे.