पुणे: मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून नंदा खरे ओळखले जायचे. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे. नंदा खरे याच नावाने अनंत खरे साहित्य लेखन करायचे. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण असायचे. त्यांची 'अंताजींची बखर' ही कांदबरी खूप गाजली. 'उद्या' नावाच्या कादंबरीसाठी त्यांना २०२० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिले असे म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. नुकतीच त्यांची 'नांगलल्यावीन भूई' ही कादंबरी प्रकाशित झाली होती.
अनंत यशवंत खरे ऊर्फ नंदा खरे हे एक कादंबरीकार आहेत. त्यांच्या स्वतंत्र व भाषांतरित लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना स्थान असायचे. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. विवेकवादी आणि विज्ञानाधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार हा गुणविशेष त्यांच्या लेखनात ठळकपणे दिसून येतो. खरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. ते मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाले नंतर त्यांनी १९६२-६७ ह्या काळात मुंबईत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले. तेथून बी टेकही पदवी घेतल्यानंतर २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते सिव्हिल इंजीनियर होते. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा आहे.
अठराव्या शतकात राहणाऱ्या ‘अंताजी खरे’ नावाच्या एक पुणेरी ब्राह्मणाने आपल्या आयुष्यातील काही निवडक प्रसंग ‘बखरी’च्या स्वरूपात लिहून ठेवले होते, आणि दोन शतकांनंतर हे जीर्णावस्थेतले कागद त्याच्या वंशजांच्या हाती लागतात अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिलेली आहे. तिच्यात वर्णन केलेला काळ १७४० ते १७५७ दरम्यानचा आहे, आणि तिची भाषिक शैली अठराव्या शतकातल्या बखरीशी मिळती जुळती आहे. नागपूरकर भोसल्यांच्या बंगालमधल्या स्वाऱ्या आणि मराठा बारगीरांनी त्यावेळी केलेले अत्याचार, एका सतीचा प्रसंग, १७५६ साली कलकत्त्याच्या फोर्ट विल्यममध्ये घडलेला काळकोठडीचा प्रसंग, प्लासीची लढाई अशा अनेक ठिकाणी अंताजी जातीने हजर असतो, व आपल्या हिशेबी आणि कातडीबचावू स्वभावाला अनुसरून हरप्रसंगी नेमके भाष्य करीत जातो, अशी कादंबरीची रूपरेषा आहे.