पुणे - जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ सिनेअभिनेते विक्रम गोखले यांचा जामीन पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह जयंत म्हाळगी आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल होता. पुण्याजवळील गिरीवन प्रकल्पात मुळशी तालुक्यातील जमीन विक्रीत फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे. यामुळे विक्रम गोखले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या डोंगरगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदा विक्री केल्याचे हे प्रकरण आहे. यात विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जवळपास 97 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप जयंत बहिरट यांनी केला असून त्यांच्या तक्रारीवरून विक्रम गोखले, जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना केली. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केल्याचा आरोप आहे. विनाहरकत मोजणी करुन घेण्याचा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत होते. प्लॉटधारकांनी मोजणी करुन घेतल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच, गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा दावाही फिर्यादीनी केला आहे.