पुणे : ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ सन्मानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्या पश्चात पत्नी माधवी महाजनी, मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
पोलिसांकडून तपास सुरू : अभिनेते रवींद्र महाजनी यांचे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव येथील राहत्या घरी निधन होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तत्पूर्वी रवींद्र महाजनी यांच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात होते.
चित्रपटात अजरामर भूमिका : मावळमधील आंबी गावात रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. रवींद्र महाजनी त्यांच्या आगामी उधळ गुलाल या महत्वाकांक्षी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार होते. त्याची तयारीदेखील रवींद्र महाजनी यांनी सुरू केली होती. उधळ गुलाल चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव बाबाजी यांनी केले आहे. या चित्रपटात रवींद्र महाजनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. त्यांना ही भूमिका आवडली होती. पण काळाने रवींद्र महाजनींवर घाला घातल्याने त्यांचा आगामी चित्रपट अपूर्णच राहिला आहे.
टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेता : रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. रवींद्र महाजनी यांचा टॅक्सी ड्रायव्हर ते अभिनेता असा जबरदस्त जीवन प्रवास आहे. 'झुंज' या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर देवता या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, हळदी कुंकू अशा अनेक चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. पानिपत या चित्रपटात रवींद्र महाजनी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. विशेष म्हणजे या चित्रपटात पिता-पुत्र गश्मीर महाजनी आणि रवींद्र महाजनी या दोघांनी एकत्र काम केले होते.