पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने बारा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. तर पिंपरीत रात्री शंभर जणांच्या टोळक्याने तलवारी आणि कोयत्यानी 10 वाहनांची तोडफोड केली. तसेच एका युवकाला जखमीही केले. या प्रकरणी अवघ्या काही तासांत दहा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.
दहा वाहनांची तोडफोड
पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरू नगर येथे दोन गटांत वाद झाले होते. यानंतर शंभर जणांच्या टोळक्याने फिल्मीस्टाईल एकत्र येत हातात कोयते आणि तलवारी घेऊन दहा वाहनांची तोडफोड केली. ही घटना रात्री साडेनऊच्या जवळपास घडली आहे. दुसऱ्या गटातील फिर्यादी तरुणाला सिनेस्टाइल मारहाण करण्यात आली. यात तो जखमी झाला असून त्याच्या पाठीवर तलवारीने वार करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी जितेश मंजुळे, आशिष जगधने, इरफान शेख, जावेद औटी, आकाश हजारे आणि इतर 95 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी निलेश पवार याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वैयक्तिक वादातून तोडफोड
शहरात वैयक्तिक वादातून वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य आरोपीसह 8-10 आरोपी ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू असून त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.