पुणे - देवाच्या आळंदीमध्ये आषाढीवारीचा सोहळा होत आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून अनेक वारकरी भाविक आळंदीनगरीत दाखल होत आहेत. येथे दाखल झालेले वारकरी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात आहेत.
माऊलींच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येक वारकरी व भाविक हा इंद्रायणी घाटावर येऊन इंद्रायणी नदीमध्ये स्नान करूनच माऊलींच्या दर्शनाला जातो. त्यामुळे इंद्रायणी घाटावर भक्तीमय वातावरण झाले आहे. इंद्रायणी घाटावर येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आळंदी नगरपरिषद, स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था या सर्वांकडून मदत कार्य केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.
मागील ३ दिवसांपासून इंद्रायणी घाटावर दिवसभर हरिनामाचा गजर करत प्रवचन व किर्तनाची बोध वाणी सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी घाटावर येणारा प्रत्येक वारकरी भाविक माऊलींच्या गोड वाणीत भक्तिमय होऊनच पुढे चालत आहे.