पुणे : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात अज्ञात 5 ते 6 जणांच्या टोळक्याने 13 वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या खिशातील बळजबरीने 1 हजार 600 रुपये काढून घेत जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेत रिक्षा, चारचाकी आणि टेम्पोचा समावेश आहे.
रोहित चंद्रकांत मुद्दे, असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यासह इतर 5 जण फरार आहेत. त्यांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. या घटनेप्रकरणी राजेश पोपट कांबळे (वय 37) यांनी तक्रार दिली आहे.
हेही वाचा - 'राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसने थकवल्याने मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुट्टीवर'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 4 च्या सुमारास तक्रारदार राजेश हे इंद्रायणी थडी येथील यात्रेतून घरी आले. तेव्हा, घरासमोर टेम्पो लावत असताना अचानक अंधारात दबा धरून बसलेल्या 5 ते 6 जणांनी खिशात हात घालत पैसे काढून घेतले. दरम्यान, कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. आरोपीच्या सोबत असलेल्या 5 जणांनी हातात असलेल्या कोयत्याने आणि लोखंडी पाईपने टेम्पोची तोडफोड केली. तसेच इतर १३ वाहनांची देखील त्यांनी तोडफोड केली.
या दहशतीमुळे लोकांना जाग आली. मात्र, त्यांनी आपआपल्या घरात जावून दारे खिडक्या बंद करून घेतल्या, असे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, तक्रारदार राजेश यांनी आरोपींनी जबर मारहाण केल्याचे देखील सांगितले.
हेही वाचा - पोपट पिंजऱ्यात कैद करणे पडले महागात, न्यायालयाने सुनावला 25 हजाराचा दंड