पुणे - निवडणुकीच्या काळात १५ लाख देण्याचे आश्वासन म्हणजे वेगळे काही नसून मोदी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहिले यातच १५ लाख आले, असे वक्तव्य परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी केले. सिंग बुधवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
राफेलबाबत बोलताना यासंदर्भात फक्त किंमत एवढेच महत्त्वाचे नसून त्यात अनेक चेक्स आणि बॅलन्स असतात, असे सांगत संरक्षण मंत्रालयाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते, असे ते म्हणाले. लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान चांगले आहे का? हे पाहणे महत्वाचे असते. राफेलबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या आहेत. राहुल गांधी यांच्याकडून होत असलेली टीका म्हणजे 'गार्बेज् इन गार्बेज् आउट' सारखी परिस्थिती आहे. त्यांना जे सांगितले जाते तेच ते बोलतात, अशी टीका सिंग यांनी केली.
मी सुद्धा चीफ ऑफ आर्मीस्टाफ होतो. त्यामुळे मी चूप राहिलेलेच चांगले. मी तोंड उघडले तर या लोकांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे सिंग म्हणाले. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी सर्व शेजारी देशांना एकत्र बोलावले आहे, बदुकांच्या आवाजात पाकिस्तान सोबत चर्चा होऊ शकत नाही हीच भारताची भूमिका कायम आहे. काश्मीरबाबत बोलताना काश्मीरमधली परिस्थिती चांगली आहे. मात्र काश्मीरबाबत अफवाच जास्त पसरवल्या जातात, असे सिंग म्हणाले.