पुणे- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेतील मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आला. पीडित मुलीने मृत्यूपूर्वी दिलेल्या कबुलीजबाबात तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला असल्याचे सांगून कोणी-कोणी केला. त्यांची नावेही सांगितली आहेत. परंतु उत्तर प्रदेश सरकार हे मानायलाच तयार नाही. त्यांच्याकडून ही घटना दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यूपूर्व कबुलीजबाब ग्राह्य धरला जावा, अशी तरतूद आहे. आणि या मुलीने मृत्यूपूर्वी आपल्यावर झालेला प्रसंग आणि आरोपींची नावेही सांगितली आहेत. परंतु उत्तर प्रदेश सरकार मात्र तिचा हा कबुलीजबाब मानायला तयार नाही. याउलट हे सरकारच आरोपींच्या नातेवाईकांना भेटताना दिसत आहे. याचाच अर्थ उत्तर प्रदेश सरकार हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तिला न्याय मिळणार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती दिसते.