पुणे: महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी मध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी- चिंचवडच्या महाविद्यालयीन परिसरात गांजा आणि मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लैंगिक क्षमता आणि बॉडी बिल्डिंगसाठी इंजेक्शन वापरले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाने रवी थापाला अटक केली आहे. त्याच्याकडून इंजेक्शनच्या 95 बॉटल्स आणि अर्धा किलो गांजा जप्त केला आहे.
सेक्स पॉवर आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापर: पिंपरीतील नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात रवी थापा हा एक पिशवी घेऊन थांबला होता. त्याच्यावर पोलिसांची नजर पडली, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या पिशवीमध्ये अर्धा किलो गांजा आणि मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनची असल्याचे समजले. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तात्काळ तपास सुरू केला. या घटनेमध्ये संबंधित इंजेक्शन हे सेक्स पॉवर आणि बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे.
संबंधित इंजेक्शन हे प्रसुती महिलेसाठी: परंतु, इंजेक्शनच्या सेवनाने त्याचा शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. शक्यतो संबंधित इंजेक्शन हे प्रसुती होत असलेल्या महिलेसाठी आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णासाठी वापरले जाते. आता हे इंजेक्शन्स व्यसन म्हणून देखील वापरल्या जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. वेळीच पालकांनी आपल्या मुलांना समज देऊन यापासून दूर राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी पालकांना केले आहे. तसेच कॉलेजमध्ये असलेल्या तरुण-तरुणीच्या पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा व्यसनापासून दूर राहवे. अशा प्रकारच्या व्यसनाचे पुढे चालून दूरगामी परिणाम होऊ शकतात. तर या धक्कादायक प्रकारामुळे पालकांनी पाल्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे.
हेही वाचा -