पुणे - खेड तालुक्याचा विकासाचे वैभव म्हणून दिवंगत माजी आमदार नारायणराव पवार यांना ओळखले जाते. आज वडगाव घेनंद येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी 'पवार साहेब तुमचा नातू म्हणून रोहित पवार यांना विधानसभेसाठी उमेदवारी देत आहात. त्याचप्रमाणे मीही तुमचाच नातू आहे. त्यामुळे मलाही खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी संधी द्यावी,' अशी अपेक्षा दिवंगत नारायणराव पवार यांचे नातू ऋषिकेश पवार यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली.
तर यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, 'कार्यक्रमाला खेड तालुक्यातील प्रत्येक नेत्याला, इच्छुकांना बोलवायचे. त्यांचा मान सन्मान करायचा. त्यानंतर इच्छुक उमेदवारांसमोरच विधानसभेसाठी मलाच उमेदवारी द्या, असे म्हणायचे. परंतु ऋषिकेश, प्रत्येकाने इच्छा व्यक्त करायची असते. त्यामुळे तुम्ही जरा थांबा. तुम्ही तर आता नारायण पवारांचीच गादी चालवायला लागलात,' असा टोला शरद पवार यांनी ऋषिकेश पवार यांना लगावला.
दिवंगत नारायणराव पवार यांचा स्वभाव विकासाला प्रोत्साहन देणारा होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. मात्र, माझ्या मतदारसंघात शाळा व्हाव्यात, शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली यावी, यासाठी बंधारे व्हावेत, हीच कामे घेऊन ते नेहमी माझ्याकडे येत असत. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून ५४ शाळा व ४६ बंधारे करूनच घेतले. असा आमदार पुन्हा महाराष्ट्रात कधी होणार नाही, असेही पवार यांनी यावेळी म्हटले.