नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसह स्टार प्रचारकही प्रचाराच्या कामाला लागलेत. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापल्या बंडखोरांना शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकजण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं प्रचारातही चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी मतदारसंघांमध्ये प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.
आपली रॅली अथवा सभेतील गर्दी मोठी दिसावी म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार प्रयत्न करत आहे. यासाठी चक्क पैसे देऊन कार्यकर्ते बोलावले जात आहेत. दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही, तेवढा काही तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचं काही मजुरांनी सांगितलंय. त्यामुळं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी तरी मजुरांना 'अच्छे दिन' आले आहेत.
आमच्यासाठी हीच दिवाळी : "निवडणुका म्हटलं की आमच्यासाठी दिवाळी असते. आम्ही मजुरीचं काम करतो. कधी काम मिळतं, तर कधी मिळत नाही. मात्र, कुठल्याही निवडणुकीत आम्हाला प्रचारासाठी बोलावलं जातं. सभा, प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चार ते पाच तासांचे पाचशे ते सहाशे रुपये दिले जातात. सोबतच नाश्ता आणि जेवणही दिलं जातं. रोजची रोजंदारी म्हणून आम्ही देखील ते काम करतो. आम्हाला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नाही. पण दोन पैसे मिळतात म्हणून आम्ही काम करतो", असं संतोष गायकवाड या मजुरानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
- ...म्हणून शक्ती प्रदर्शन करणं गरजेचं : पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये गर्दी असणं उमेदवाराला अपेक्षित असतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या असणं, सभेला गर्दी कमी असल्यावरुन टीका केली जाते. त्यामुळं आपल्या पक्षाची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी उमेदवाराला अनेकदा नागरिकांना पैसे देऊन गर्दी जमवावी लागते.
हेही वाचा -