पुणे - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यात तात्पुरते कारागृह उभारले आहे. या कारागृहात काही कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. यातील 2 कैद्यांनी पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर खबरदारी म्हणून राज्यातील काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. तसेच काही कैद्यांसाठी तात्पुरत्या कारागृहाची सोय करण्यात आली होती. कैद्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग राखण्याच्या दृष्टीने अनेक भागात तात्पुरत्या स्वरुपाचे कारागृह उभारण्यात आले आहेत. पुण्यातील येरवडा भागातील एका संस्थेच्या इमारतीमध्ये असे तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. या कारागृहात काही कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यातील दोन कैद्यांनी शौचालयाच्या खिडकीतून पलायन केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील एका संस्थेच्या इमारतीमध्ये शासनाच्या आदेशानुसार तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी काही कैदी ठेवण्यात आले असून त्यातील हर्षद सय्यद आणि आकाश बाबुराव पवार शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास शौचालयाच्या खिडकीतून पळून गेले. बराच वेळ हे कैदी दिसत नसल्याने शोध घेतला असता. त्यांनी पलायन केल्याचे समजले. या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.