पुणे - राजगुरूनगरासह लगतच्या गावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन खुनासह दोघांची आत्महत्या झाल्याच्या धक्कादायक घटना आज दुपारी समोर आल्या आहेत. पती पत्नीतील घरगुती वादात घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली. काव्या अमित बागल वय दीड वर्षे, तिची आई योगिता अमित बागल (३२), पूजा पप्पू चव्हाण (२०), चेतन लहू रोडे (३०) अशी मृतांची नावे आहेत.
राजगुरूनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील आनंद नगरमधील श्री हरेश्वर अपार्टमेंटमध्ये नवरा बायकोच्या भांडणातून पत्नीने आपल्याच पोटच्या दीड वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. योगिता बागल आणि मुलगी काव्या (रा. मुळगाव पेठ पारगाव) ता. आंबेगाव अशी मृतांची नावे आहेत. मृत योगिता हिचे अमित तानाजी बागल (२८) सोबत दुसरे लग्न झाले होते. ते सहा महिन्यापूर्वी राजगुरूनगर येथे वास्तव्यास होते. अमितची कंपनीमधील नोकरी गेल्याने आणि कोरोना लॉकडाऊन झाल्याने पैशांची अडचण निर्माण झाल्याने भाड्याच्या खोलीत राहणे परवडत नसल्याने गावी राहण्यास जाण्याच्या कारणास्तव मृत योगिता व अमितची भांडणे होत होती. त्यातच अमितला दारूचे व्यसन असल्याने त्यांचे नेहमीच भांडण होत होते. त्यातून आठ दिवसांपूर्वी योगिताने सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
दुसऱ्या घटनेत राजगुरूनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यावरील वाळुंजस्थळमध्ये एका २० वर्षीय परप्रांतीय महिलेचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. पूजा पप्पू चव्हाण (२०) रा ताशेरी रामपूर, उत्तरप्रदेश असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या परप्रांतीय मजूर पूजा व पप्पू चव्हाण हे दोन महिन्यांपूर्वी राजगुरूनगर येथे आले होते. काल पप्पू चव्हाण हा रोजंदारीने कामाला गेला होता. तो दुपारी पुन्हा जेवायला आला. जेवण करून पुन्हा कामाला गेला. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्याची पत्नी पूजा ही बेशुद्ध असल्याच्या अवस्थेत असल्याने तिला तत्काळ शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून पप्पू चव्हाण यास ताब्यात घेतले आहे. तिचा खून नक्की कोणी व कोणत्या कारणास्तव केला याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
तिसऱ्या घटनेत गोसासी ता. खेड येथे पती पत्नीच्या किरकोळ भांडणातून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चेतन लहू रोडे (३०) रा. तुकई भांबुरवाडी, सध्या गोसासी ता. खेड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. चेतन लहू रोडे हे त्यांच्या मामाकडे शेती करीत होते. नवरा बायकोचे किरकोळ भांडण झाल्यानंतर त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. अधिक तापास खेड पोलीस करीत आहेत.