पुणे - बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ५ मोटरसायकल ५ अँड्रॉइड मोबाइलसह तांब्याच्या पट्ट्या असा २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
२ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोटरसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावरून संशयित इसम रोहन उर्फ कल्ल्या अविदास माने (वय २०, रा. सूर्यनगरी ता. बारामती), ओंकार सुनील चंदनशिवे (वय २०, रा. तांदुळवाडी, ता.बारामती) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी बारामती तालुका, बारामती शहर, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच मोटरसायकली व पाच वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाइल व २५ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या असा एकूण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस काॅन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शंशिकांत दळवी, होमगार्ड सिद्धार्थ टिंगरे, ओंकार जाधव यांनी केली.