पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून 5 दुचाकी आणि 4 मोबाईल असा एकूण 3 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रवींद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय - 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), रवी नरसप्पा रेड्डी (वय - 25, रा. आकुर्डी), गौरव अनिल सरोदे (वय - 24, रा. आकुर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली.
निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल मिसाळ हे इतर स्टाफसह गस्त घालत होते. यावेळी त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुचाकी आणि मोबाईल चोरी करणारे सराईत आरोपी हे आकुर्डी येथे आले आहेत. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोबाईल आणि दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार निगडी पोलिसांनी रविंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी आणि रवी नरसप्पा रेड्डी या सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 13 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निगडी पोलीस ठाण्यातील 3, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे आणि चिंचवड पोलीस ठाणे येथील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक डी.एस.कोकाटे, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतिश ढोले, शंकर बांगर, विलास केकाण, रमेश मावसकर, आत्मलिंग निबांळकर, विनोद व्होनमाने, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे, अमोल साळुखे यांच्या पथकाने केली आहे.