राजगुरुनगर (पुणे) दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. मात्र याच दिवशी शनिवारी ''मुलीच्या बदल्यात मुलगी'' असे म्हणत पुण्यातील दाम्पत्याने खेड तालुक्यातील आंभू गावातून एका मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुलीच्या बदल्यात मुलगी
पुण्यातील एक मुलगी खेड तालुक्यातील आंभू गावातील मुलाबरोबर लग्नाच्या हेतुने पळून गेली होती. त्यामुळे काही जणांनी थेट आंभू गाव गाठत दुसऱ्या मुलीचे अपहरण केले व मुलाच्या पालकांना सांगितले की, आमची मुलगी तुमच्या मुलासोबत आहे. जर तुम्हाला तुमची मुलगी सुखरूप हवी असेल तर आमची मुलगी आमच्या घरी आणून द्या आणि तुमची मुलगी घेऊन जा. दरम्यान या प्रकरणी राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलगी सुखरुप, दोन अपहरणकर्त्यांना अटक
मुलीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेतला. अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. आरोपींना ताब्यात घेतले असून, मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा- पुणे पदवीधरसाठी श्रीमंत कोकाटेंची उमेदवारी कायम; संभाजी ब्रिगेडकडून शिक्का मोर्तब
हेही वाचा- कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बसचालकावर आली बिगारी काम करण्याची वेळ