पुणे - राज्यात रविवारी 16 जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झालं. राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायत निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 76 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट मतदारांनी सरपंचपदासाठी मतदान केले. या सर्व ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहिर होणार आहे. गुलाल नेमका कुणाचा हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या निकालाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.
पुण्यातल्या भोर तालुक्यातील निवडणूक असलेल्या दोन्हीही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. भोलावडे आणि किवत या दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीच्या पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळालं. दोन्हीही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. यापैके भोलावडे ग्रामपंचायत ही आधी काँग्रेसच्या ताब्यात होती तर किवत ग्रामपंचायत ही नव्याने स्थापन झालेली ग्रामपंचायत आहे. भोलावडे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे प्रविण जगदाळे तर किवत ग्रामपंचायतीमध्ये तानाजीबापू चंदनशिव हे उमेदवार सरपंच म्हणून विजयी झाले आहेत. विजयानंतर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.