पुणे - बेटी वाचवा देश वाचवा असा नारा देशभरात दिला जात आहे. मात्र, त्यातच मुली नकोश्या होत चालल्याच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. यातच पुणे-नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या बाजुला दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळुन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नकोशी झालेल्या मुलीवर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी टोलनाक्यावरचे आयआरबीचे कर्मचारी लघुशंकेसाठी नदीकाठी गेला असता त्यांना प्लॅस्टिक पिशवीमध्ये वळवळ होताना दिसली. त्या पिशवीत साप असावा, अशी शंका त्याना आली. केवढा साप आहे हे पाहण्यासाठी तो पिशवी जवळ गेले असता त्यांना स्त्री जातीचे एक ते दोन दिवसाचे जीवंत अर्भक आढळून आले. त्या अर्भकाला साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवल्याचे दिसून आले.
अतिशय ह्रदय पिळवटनारी घटना असल्याचे सांगत कुतुब शेख याने या दीड दिवसाच्या जीवंत स्त्री अर्भकाला स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. एका जागरुक नागरिकांच्या धाडसातुन या अर्भकावर तातडीने उपचार मिळाल्याने नकोशी झालेली चिमुकली बचावली आहे. तिच्यावर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगातही मनाला सुन्न करुन सोडणारी ही घटना आजच्या काळात घडत आहे. मुलगी वाचवा देश वाचेल असे नारे दिले जातात मात्र प्रत्येक्षात मुलगी नकोशीच झालीय.