पुणे - घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीर सट्टेबाजी करणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरात पोलिसांनी एकाच वेळी केलेल्या कारवाई दरम्यान बेकायदेशीर सट्टेबाजी करणारे मोठे बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी याप्रकरणी सहा गुन्हे दाखल केले असून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घाेड्यांच्या शर्यतीवर अधिकृत सट्टेबाजी बुकिंग घेणाऱ्या टर्फ क्लबने सट्टा घेणे अपेक्षित असताना बेकायदेशीररित्या रेसकाेर्सचे सट्टेबाजी बुकी कशाप्रकारे घेत हाेते, यासंर्दभात नामांकित टर्फ क्लबच्या सट्टेबाजी प्रकरणी चाैकशी केली जाणार असल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यात प्रथमच घाेड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीररित्या सट्टेबाजीचे प्रकरण या कारवाईने उघडकीस आले आहे.
दाेन माेठ्या बुकींसह 31 जणांना अटक
पाेलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, वानवडी, काेंढवा, हडपसर हद्दीत अवैध प्रकारे आर्थिक फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशीरित्या घाेड्यांच्या शर्यतीवर दुसऱ्यांचे नावाचे सिमकार्ड वापरून फाेनद्वारे ऑनलाईन सट्टा लावून जुगार खेळण्याचा गैरप्रकार सुरू हाेता. याबाबत परिमंडळ चारचे पाेलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली 27 परिवक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि दहा अधिकारी अशा 37 जणांचे पथकाने तीन ठिकाणी छापे मारले. यामध्ये मनीष आजवानी आणि शब्बीर खंबाती या दाेन माेठ्या बुकींसह 31 जणांना अटक करण्यात आली आहे.
टर्फ क्लब रेसकाेर्स याठिकाणी अधिकृत बुकिंग घेत असताना, त्याठिकाणीच बुकी घेणे अपेक्षित हाेते. परंतु, पाेलीस तपासात घाेड्यांच्या शर्यतीवरील बेकायदेशीर सट्टेबाजी बाहेर काही जागी घेतले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती टर्फ क्लबला हाेती का यासंर्दभातील सखाेल चाैकशी केली जाणार आहे.
विशिष्ट अॅपद्वारे बेटिंग
पाेलीस उपआयुक्त पंकज देशमुख म्हणाले, रेसकाेर्समध्ये ज्या बुकींना अधिकृत परवाना मिळालेला आहे, त्यांना सट्टा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, रेस-999 अशासारख्या वेबसाईटच्या माध्यमातून लाईव्ह रेस पाहून तसेच विशिष्ट अॅप विकसित करून बेकायदेशीरप्रकारे बुकी सट्टा घेत असल्याचे तपासात समाेर आले आहे. बुकींवर कारवाई करण्यात आल्यानंतर दाेन दिवस ते पाेलिसांना आम्ही अधिकृत असल्याचे सांगतात. परंतु, अद्याप एकानेही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे सादर केलेली नाहीत. बुकींच्या घरावर छापेमारी केल्यानंतर त्यांना सट्टा घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.