खेड (पुणे) - उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेडच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा या जंगली वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मागील दोन वर्षांपासून हिरडा खरेदी बंद आहे. त्यात कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडली आहे. आदिवासी भागात हिरडा तोंडणी जोरात सुरू आहे. त्यामुळे हिरडा खरेदी तात्काळ सुरू करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा बिरसा क्रांती दलाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
चार वर्षांपासून बाळ हिरडा माल खरेदी बंद
हिरडीच्या झाडापासून हिरडा हे औषधी फळाचे उत्पादन मिळते. हिरडा हा माल झाडावरून दोन प्रकारात घेण्यात येते. बाळहिरडा हा माल एप्रिल, मे महिन्यात झाडावरून गोळा केला जातो तो कडक उन्हात वाळवून सुका करून त्यांची विक्री केली जाते. मोठा हिरडा हा माल झाडावर परिपक्व झालेला असतो. त्याला बी आलेली असते. हा माल झाडावरून ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यात झाडावरून गोळा केला जातो. आदिवासी शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा माल खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु आदिवासी विकास महामंंडळ आदिवासी शेतकर्यांकडून गेल्या चार वर्षांपासून बाळ हिरडा माल खरेदी करत नाही. हा संपूर्ण माल आदिवासी विकास महामंंडळानी खरेदी न केल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे फार मोठे प्रमाणात नुकसान होते.