पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ( Mumbai Pune Expressway ) होणारी अपघाताची मालिका खंडित होत नसल्याने अपघात रोखण्यासाठी विशेष योजना राबवण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होणार आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी, उप-प्रादेशिक अधिकारी,पनवेल - अनिल पाटील, पेण - शशिकांत तिरसे, पिपंरी चिंचवड - अतूल आदे, प्रदीप शिनगारे, चंद्रकांत माने, संदीप खोतकर, यांच्या समवेत वाहतूक पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांच्यासोबत मुंबई पुणे महामार्गावरील "ब्लॅक स्पॉट" समजल्या जाणाऱ्या भागांचे सर्वेक्षण केले.
ब्लॅक स्पॉटची पाहणी - अपघात होण्यामागची कारणे शोधून ते टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी प्रयत्न करण्याकरिता प्रत्यक्षपणे ब्लॅक स्पॉटवर उतरून सविस्तर चर्चा केली. याच सोबत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर (जुना मुंबई पुणे मार्ग) देखील असलेल्या धोकादायक भागांची पाहणी केली. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपघाताच्या वेळी मदतकार्य करताना जाणवणारी प्रमुख कारणे कोणती असतात यांची यावेळी माहिती घेतली. आजवर मुंबई, पुणे मार्गवर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र कारवाई होऊनही अपघात टाळता येत नव्हते. अपघातामध्ये जीवितहानी होऊन अनेक कुटुंब उध्वस्थ झाली आहेत. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठीच या मार्गवरील संभाव्य अपघाताची महत्वाची ठिकाने पाहून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विचारविनिमय कारण्यात आला आहे.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना - वारंवार होणारे अपघात रोखण्याकरीता महामार्गावर आवश्यक ठिकाणी प्रकाश योजना करणे, रिफ्लेक्टर्स लावणे, ब्लॅक स्पॉट समजली जाणारी ठिकाणे वाहन चालकांच्या लक्षात आणून देण्याकरिता विविध सुचना फलक प्रदर्शित करणे, वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे इत्यादी विषयांवर अमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी यावेळी सांगितले.