पुणे : आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना 'हे बघा हिजड्यांचे सरदार', असे वक्तव्य केले होते. या विरोधात तृतीयपंथी आक्रमक होत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणेंविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीय पंथी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
गुन्हा दाखल करा अन्यथा..: पोलीस प्रशासनाने सरकारी दबावाला बळी पडून नितेश राणेंवर गुन्हा दाखल केला नाही. मात्र, जोपर्यंत नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आम्ही आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे. तृतीयपंथीयांनी यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.
लिंगावरुन भेदभाव करणे कायद्याने गुन्हा : यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, अशी तक्रार पोलिसांसमोर प्रथमच आली आहे. त्यामुळेच पोलिसांनी आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे वेळ मागितला आहे. संध्याकाळी उशिरा आमची भूमिका जाहीर करणार असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. तसेच लिंगावरुन भेदभाव करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, आमदार नितेश राणे यांनी लिंगभेद करीत कायद्याचे उल्लंघन केल्याची प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. असे शब्द आमदार नितेश राणे यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा वापरले आहेत, असे देखील सुजात आंबेडकर म्हणाले. त्यांच्यावर १५३ अ अन्वये कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आज सायंकाळपर्यंत पोलीस काय कारवाई करतात ते बघू, त्यानंतरच आमची भूमिका स्पष्ट करू, अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे.
अदखलपात्र गुन्हा दाखल करा : यावेळी असीम सरोदे म्हणाले की, राणे यांनी हिजडा शब्द वापरल्याची तक्रार आहे. हा शब्द चांगल्या हेतूने उच्चारला गेला नाही हे दिसून येते. आज तृतीयपंथीयांच्या रक्षणासाठी कायदे तयार झाले. मात्र तरीदेखील काही राजकारणी बेताल वक्तव्ये करत आहेत. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर उच्च न्यायालयात जाऊ, असे सरोदे यांनी सांगितले.